Talegaon Dabhade News : आदर्श महिलांचा रविवारी होणार सन्मान

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहर परिसरातील आदर्श महिलांचा विविध पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या रविवारी (दि. 27) सायंकाळी सहा वाजता हॉटेल इशा येथे हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती आयोजक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी दिली.

रविवार 27 मार्च रोजी येथील हॉटेल ईशा येथे सायं. 6 वाजता साजर्‍या होणार्‍या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे भूषवतील तर समाजाच्या विविध स्तरावर आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या आदर्श महिलांना आमदार सुनिल (आण्णा) शेळके आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे सन्मानपूर्वक गौरविणार आहेत. यावेळी आध्यात्मिक व प्रेरणादायी वक्ते, संत साहित्याचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक ह.भ.प. पंकजमहाराज गावडे उपस्थितांना संबोधनपूर्वक मार्गदर्शन करतील.

उपक्रमात संस्थांच्या वतीने ‘राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला पुरस्कार’ कुलस्वामीनी महिला मंचाच्या अध्यक्षा सौ. सारिका सुनिल शेळके यांना प्रदान करण्यात येणार असून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न महिला पुरस्काराने’ येथील सेवाधाम ग्रंथालय व वाचनालयाच्या सचिव डॉ. सौ. वर्षा वाढोकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे, तर श्रीमती शांताबाई मोहनराव काकडे यांना ‘शांताई आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यावेळी समाजातील कर्तृत्ववान ज्येष्ठ महिलांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व साध्य करणार्‍या श्रीमती कुसुम शिवाजी वाळुंज, सहकार क्षेत्रात सौ. शबनम अमिन खान, साहित्यिक क्षेत्रात सौ. ज्योती नागराज मुंडर्गी, वैद्यकीय क्षेत्रात सौ. शोभा पोपट कदम, कृषी व उद्योग क्षेत्रात सौ. सुरेखा मनोहर काशिद, सांस्कृतिक क्षेत्रात सौ. अंजली विवेक सहस्रबुद्धे आणि सांप्रदायिक क्षेत्रात श्रीमती चांगुणाबाई जगन्नाथ भेगडे यांना तर उत्कृष्ट महिला बचत गट म्हणून माळवाडीच्या सावित्रीबाई फुले महिला बचत गटाला गौरविण्यात येणार आहे.

महिला दिनानिमित्त आयोजित तसेच शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या वतीने संपन्न होणार्‍या या उपक्रमात समाजाच्या उद्धारासाठी शिवधनुष्य पेलणार्‍या, विविध क्षेत्रात कार्यरत राहून उल्लेखनीय कार्य करणार्‍या, आदर्श माता- भगिनींच्या, आदिशक्तीच्या सन्मानपूर्वक गौरव उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांसह उपाध्यक्ष दादासाहेब उर्‍हे, कैलास काळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव सौ. रजनीगंधा खांडगे, रो. प्रवीण भोसले, प्रकल्प प्रमुख मिलिंद शेलार, विलास भेगडे, रो. विन्सेंट सालेर यांसह संस्था पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.