Sangvi News : ‘या जागेत परत आला तर दहा वेळा फायरिंग करील’; थेट जागा मालकाला धमकी

सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – स्वतःच्या मालकीच्या जागेत जागा मालक बांधकाम विषयक कामे करत असताना सात जणांनी मिळून त्यांना शिवीगाळ आणि धमकी देत चालू काम बंद पाडले. बांधकामासाठी आणलेले साहित्य वॉचमनला दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करून दरोडा टाकून चोरून नेले. तसेच जागामालकाला जीवे मारण्याची धमकी देत इथे परत आल्यास दहा वेळा फायरिंग करेन अशी धमकी दिली. याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 जानेवारी 2019 ते  28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत पिंपळे निलक येथे घडली.

अजिंक्य विठ्ठल काळभोर वय 45, रा. तुळजाई वस्ती, आकुर्डी यांनी याबाबत गुरुवारी दि. 24 सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नानासाहेब गायकवाड रा. औंध, केदार उर्फ गणेश गायकवाड रा. औंध, गणेश साठे, राजा पुर्ण नाव पत्ता माहीती नाही आणि अन्य दोन ते तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पिंपळे निलख येथे जागा आहे. त्यांच्या मिळकतीवर बांधकाम करण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन फिर्यादी बांधकामासाठी आवश्यक असलेली लाईन आऊट करण्यासाठी कामगार आणि ठेकेदार यांना घेऊन  त्यांच्या जागेत गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ, धमकी देऊन त्यांचे चालू असलेले काम अनाधिकाराने बंद पाडले. तसेच फिर्यादी यांनी त्यांच्या जागेला संरक्षणासाठी केलेले कंपाऊंड, लोखंडी पोल, लोखंडी पाण्याची टाकी, तसेच बिल्डिंग कामासाठी आवश्यक असलेले साहित्य वॉचमनला दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करून दहशत निर्माण करून दरोडा टाकून चोरून नेले.

एकूण 48 हजार रुपयांचे साहित्य आरोपींनी चोरून नेले. आरोपींनी फिर्यादी यांना पुन्हा या जागेत आला तर तुला जीवे ठार मारू. इथे परत आला तर दहा वेळा फायरिंग करील. अशी धमकी देऊन फिर्यादी यांना जागेत काम करण्यापासून परावृत्त केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.