Pune News : “इनकम टॅक्स”चे अधिकारी असल्याचे सांगत सराफ व्यवसायिकाचे अपहरण

एमपीसी न्यूज : पुण्यातल्या जांभुळवाडीत “इनकम टॅक्स”चे अधिकारी असल्याचे सांगत सराफ व्यवसायिक व त्यांच्या मित्रांचे अपहरण करून 20 लाखांची रोकड आणि 15 लाखांचे सोने घेऊन टोळीने पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी 24 तासात या अपहरणाचा थरार उघड केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

याप्रकरणी 41 वर्षीय सराफ व्यवसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 6 जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जांभुळवाडी रोड येथील दत्तनगर भागात उच्चभ्रू सोसायटीत राहतात. दरम्यान त्यांचे सराफी दुकान आहे. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते व त्यांचे मित्र सोसायटीच्या बाहेर थांबले होते. त्यादरम्यान इनोव्हा कारमधून 6 व्यक्ती त्यांच्याकडे आल्या. आम्ही इनकम टॅक्स अधिकारी आहोत. तुम्ही टॅक्स भरत नाही. बेकायदेशीर सोन्याचा धंदा करता. सरकारची फसवणूक करता. तुमच्यावर इनकम टॅक्सची रेड आहे, असे म्हणून त्यांना धमकावले. तसेच त्यांना इनोव्हा कारमध्ये बसवले.

त्यानंतर त्यांना स्वामी नारायण मंदिर येथे नेले. तसेच, त्यांना हत्याराचा धाक दाखवून हाताने मारहाण केली. तर त्यांच्या खिशातील 11 हजार 200 रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. तर पुन्हा हत्याराचा धाक दाखवत त्यांच्याकडून 20 लाखांची रोकड व 15 लाख रुपयांचे 30 तोळे सोने घेऊन पसार झाले. यानंतर त्यांनी तात्काळ भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी 24 तासात या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.