Pimpri News : भिंत कोसळून मृत्यू झाल्या प्रकरणी महापालिका ठेकेदार, कामगार, सोसायटी बिल्डर, चेअरमन विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरीगावात एका सोसायटीची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी महापालिकेचे ठेकेदार, कामगार, संबंधित सोसायटीचे बिल्डर, चेअरमन आणि अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी घडली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांडपाण्याच्या ड्रेनेजचे व पेविंग ब्लॉकचे काम करणारे कर्मचारी, ठेकेदार, साई कम्फर्टस सोसायटीची संरक्षक भिंत बांधणारे बिल्डर काळू उर्फ विनोद मतानी, साई कम्फर्टस सोसायटीचे चेअरमन आणि इतर यांच्या विरोधात याप्रकरणी निष्काळजीपणे मृत्यू घडविल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश जयराम गायकवाड (वय 47, रा. जुना काटे-पिंपळे रोड, पिंपरीगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत राजेश यांचा भाऊ रणजित जयराम गायकवाड (वय 46) यांनी शनिवारी (दि. 28) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीगावात साई कम्फर्टस सोसायटीच्या कंपाउंडच्या भिंतीलगत महापालिकेकडून सांडपाण्याच्या ड्रेनेज आणि पिविंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरु आहे. हे काम पाहून येत असताना शुक्रवारी दोन वाजताच्या सुमारास साई कम्फर्टस सोसायटीची संरक्षक भिंत फिर्यादी यांचे भाऊ राजेश यांच्या अंगावर कोसळली. त्यामध्ये राजेश गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 304 ( अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.