MI vs RCB : मुंबई संघाचे पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या, रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाकडून मानहानीकारक पराभव

7 गडी आणि 9 चेंडू  राखुन बंगलोरने चारली धूळ

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : टाटा आयपीएल 2022 मधल्या कालचा18 वा  सामना पुण्यात झाला. ज्यात रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाने मुंबई इंडियन्सवर जबरदस्त वर्चस्व राखत एक मोठा विजय मिळवून आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली. तर मुंबई इंडियन्सला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. काल बंगलोर संघाचा कर्णधार दुप्लेसीने नाणेफेक जिंकून मुंबई संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले,आणि केवळ 151 अशा मामुली धावांमध्ये रोखून या निर्णयाला सार्थही ठरवले.

प्रचंड दडपणाखाली असलेल्या मुंबई संघाच्या डावाची सुरुवात काल तशी चांगलीच झाली होती, रोहीत आणि ईशानने 38 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी सलामी देत आज तरी आम्ही सकारात्मक आणि जिंकण्यासाठीच खेळत आहोत असाच संदेश दिला,मात्र  संघाची धावसंख्या बरोबर 50 असताना कर्णधार रोहीत 15 चेंडूत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 26 धावा करून हर्षल पटेलच्याच हातात झेल देऊन त्याला आपली विकेट देऊन तंबुत परतला.

त्यानंतर फक्त दहा धावांची भर पडते न पडते तोच भावी आणि मिनी एबी म्हणून ओळखला जाणारा दिवाल्ड ब्रेवीस फक्त 8 धावा करून हसरंगाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि पाठोपाठ या मोसमात आतापर्यंत तरी भरात असलेला ईशान किशन सुद्धा 26 धावांवर असताना आकाशदीपच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि  याच षटकात युवा तिलक वर्माही धावबाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर पोलार्डही हसरंगाच्या फिरकीला फसला आणि एकही धाव न करता पायचित झाला  मुंबई संघ पाच बाद 62 अशा कठीण अवस्थेत आला.

यावेळीच मुंबई संघ आजही हारणार याचा अंदाज यायला लागला होताच. पण सूर्यकुमार यादवने मात्र शस्त्र आपले बॅट परजायला सुरुवात केली आणि घणाघाती फलंदाजी करताना खेळपट्टी फलंदाजीसाठी जराही प्रतिकूल नाही हेच सिद्ध करत आपले आणखी एक अर्धशतक पूर्ण करत संघाला दीडशेच्या टप्पाही पार करून दिला.आयपीएल मधले आपले पंधरावे अर्धशतक पूर्ण करताना त्याने केवळ 37 चेंडूत 5 चौकार आणि सहा उत्तुंग षटकार मारत नाबाद 68 धावा केल्या, त्याला उनाडकटने नाबाद 13 धावा करत चांगली साथ दिली,ज्यामुळे मुंबईच्या नावावर151 धावा लागल्या.बंगलोर संघाकडून हसरंगा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

उत्तरादाखल खेळताना बंगलोर संघाला हे लक्ष फारसे अवघड आहे असे एकदाही न वाटावा असा खेळ आरसीबीच्या फलंदाजांनी केला, आठ षटकात अर्धशतकी भागीदारी करून डूप्लेसी उनाडकटच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला खरा, पण युवा अनुज रावतने माजी कर्णधार कोहली सोबत आणखी एक अर्धशतकी भागीदारी करताना डूप्लेसीच्या बाद होण्याने काही नुकसान झालेय असे एकदाही वाटू दिले नाही.

आयपीएल मधले आपले पहिले अर्धशतक आणि सर्वोच्च 66 धावा करून तो धावबाद झाला खरा,पण तोवर त्याने संघाच्या विजयाचा पाया रचला होताच.त्याने 47 चेंडूत 6 षटकार आणि दोन चौकार मारत 66 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने आज बऱ्यापैकी भरात दिसत असलेला आणि आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला कोहली 48 धावांवर असताना ब्रेविसच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.कोहलीला आज बऱ्यापैकी सूर गवसला असे वाटत असतानाच तो बाद झाला. त्याने एवढेच झाले की मुंबईचा 8 गडी राखून होणारा पराभव सात गडी राखुन असा झाला.

उरलेले काम दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेलने अगदी थाटात आणि धुमधडाक्यात केले,आणि आपल्या संघाला आणखी एक विजय मिळवून देताना मुंबई संघाचा आणखी एक पराभव केला.ज्यामुळे मुंबई संघावर आता नक्कीच जास्तीचे दडपण असणार आहे.

संक्षिप्त धावफलक

मुंबई

20 षटकात 6 बाद 151

सूर्यकुमार यादव नाबाद 68, ईशान 26,रोहीत 26

पराभूत विरुद्ध

बंगलोर रॉयल चॅलेंजर्स

3 बाद 152

अनुज रावत 66,कोहली 48

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.