Pune News : पत्नीने मोबाईलवर ब्लॉक केल्याने पतीचा चढला पारा, रागाच्या भरात…
एमपीसी न्यूज : भांडण झाल्यामुळे माहेरी गेलेल्या पत्नीने मोबाईलवर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. इतकंच नाही तर भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या मेव्हणावर देखील आरोपीने हल्ला केला. पुण्यातील धायरी परिसरात रविवारी ही घटना घडली. सचिन ज्ञानोबा आमले असे जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी सचिनचा आणि फिर्यादी महिलेचा विवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुले आहेत. पत्नी एका बँकेत काम करते तर आरोपी काम धंदा नसल्यामुळे सध्या घरीच असतो. काही दिवसापूर्वी त्यांच्यात भांडण झाल्यामुळे फिर्यादी या माहेरी निघून गेल्या होत्या. आरोपी वारंवार फोन करत असल्यामुळे त्यांनी त्याला मोबाईल वर ब्लॉक केले होते. त्यामुळे पत्नी संपर्क होत नव्हता.
त्याच रागाच्या भरात तो रविवारी पत्नीच्या माहेरी गेला. त्यानंतर पत्नीचा मोबाईल घेऊन ब्लॉक काढण्याचा प्रयत्न करत असताना पतीने विरोध केला. त्यावेळी रागाच्या भरात त्याने आता तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत पोटात चाकू खुपसला. तर तिच्या मानेवर दंडावर आणि बोटावर देखील चाकूने वार केले. भांडण सोडवण्यासाठी मेव्हणामध्ये आला असता त्याच्यावर चाकूने वार केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.