Nigdi News : प्राधिकरणात पादचारी तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटले. ही घटना रविवारी (दि. 9) निगडी प्राधिकरण येथे रात्री घडली.

राहुल संतोष चव्हाण (वय 30, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी चव्हाण हे महापौर मैदान येथून आकुर्डी पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी चालत जात होते. ते आर्किटेक्ट स्टुडिओ येथे आले असता काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तीन अज्ञात चोरटे तिथे आले. त्यातील एकाने फिर्यादी चव्हाण यांच्या गळ्यातील एक हजार 900 रुपये किमतीची चांदीची चैन जबरदस्तीने ओढून घेतली.

दुसऱ्या चोरट्याने चव्हाण यांच्या हातातील 21 हजार 490 रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला. तर तिसर्‍या चोरट्याने पॅन्टच्या पाठीमागील खिशात हात टाकून 600 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर चोरटे महापौर मैदानाच्या दिशेने वेगाने दुचाकीवरून निघून गेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.