Pune News : पुण्यात प्रसादातून गुंगीचे औषध देऊन प्रवाशांनी रिक्षाचालकाला लुबाडले

एमपीसी न्यूज : रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन लुबाडल्याची घटना उघडकीस आली. रिक्षाचालकाच्या गळ्यातील चोपन्न हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आरोपींनी चोरून नेली. पुणे स्टेशन ते चव्हाणनगर या दरम्यान ही घटना घडली. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक अशोक बापूराव सोनवणे (वय 65) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. 14 एप्रिल रोजी ते पुणे स्टेशन परिसरात असताना पद्मावती येथे जाण्यासाठी तीन प्रवासी त्यांच्या रिक्षात बसले होते. त्यांनी रिक्षाचालक सोनवणे यांना दगडूशेठ गणपती येथे दर्शन घेण्यासाठी जायचे असल्यामुळे थांबण्यास सांगितले. दर्शन घेतल्यानंतर ते परत रिक्षाने पद्मावतीच्या दिशेने निघाले. वाटेत त्या प्रवाशांनी रिक्षाचालक सोनवणे यांना प्रसाद दिला. या प्रसादामध्ये गुंगीचे औषध होते.

रिक्षाचालक सोनवणे यांना गुंगी येईपर्यंत आरोपींनी सातारा रोड, ट्रेझर पार्क आणि हत्ती चौक या भागात फिरवले. त्यानंतर सोनवणे बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या गळ्यातील 22 ग्रॅम वजनाची 54 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.