Pune News : घरफोडीच्या घटना वाढल्या ! सहकारनगर, वानवडी आणि कोंढवा परिसरातून लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासारख्या घटना रोखण्यात पोलिसांना सतत अपयश येत आहे. शहरातील सहकारनगर, वानवडी आणि कोंढवा परिसरात पुन्हा एकदा घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेतून चोरट्यांनी पुन्हा एकदा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 

सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणी विद्या जितेंद्र दसवडकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे घर कुलप बंद असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून रोख तीन लाख आणि 90 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहे.

याशिवाय कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अशोक म्युज सोसायटीतील रो हाऊस मध्ये अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली. फिर्यादी अलीमुन्नीस मोहम्मद उमर काजी (वय 65) यांच्या रो हौसकच्या बाथरूमची लोखंडी खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाच्या ड्रॉवरचे लॉक डुप्लिकेट चावीने उघडून एक लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरटा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तर वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आर्मी पब्लिक स्कूल च्या गेट जवळून दुचाकीने जाणाऱ्या एका व्यक्तीला दोन व्यक्तीने अडवले आणि त्याच्याकडे 20 रुपये मागितले. फिर्यादी यांनी पैसे देण्यासाठी पाकीट काढले असताना त्याच्या पाकिटातील रोख 17 हजार रुपये जबरदस्ती घेऊन आरोपी पळून गेले. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.