Pune News : अपहरण झालेल्या मुलाची माहिती देण्यासाठी खंडणी मागितली, भोरच्या तरूणाला अटक

एमपीसी न्यूज : पुण्यातून अपहरण झालेल्या चार वर्षे चिमुरड्याच्या वडिलांना फोन करून मुलाची माहिती देण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आनंद उर्फ अक्षय हनुमंत शिर्के (वय 27) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शहरातून 4 वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. परंतु मुलाच्या वडिलांनीही सोशल मीडिया वरून पोस्ट शेअर करत बाळाचा शोध घेण्यासाठी विनंती केली होती.

ही पोस्ट वाचून भोर तालुक्यातील आळंद येथील आनंद शिर्के या तरुणाने मुलाच्या वडिलांना फोन केला. तेच मुलाचे पालक असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर मेसेज करून तुमच्या मुलाची व त्याला घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती असल्याचे सांगितले. त्याची माहिती पाहिजे असल्यास दोन लाख रुपये ची मागणी त्याने केली.

दरम्यान मुलाच्या वडिलांनी स्थानिक पोलिसांकडे याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फोन करणाऱ्या मुलाचा माग काढला आणि भोरमधील आलंदवाडी इथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.