Talegaon Dabhade News : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. तसेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरात अनेक ठिकाणी नवीन व्यवसायाचे उद्घाटन, भूमिपूजन समारंभ पार पडले. यानिमित्त गणपती माळ येथील घाटावर बैलगाडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा रविवारी (दि. 3) आणि सोमवारी (दि. 4) झाल्या.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात उत्सव समितीचे अध्यक्ष गोकुळ भेगडे यांच्या हस्ते अभिषेक पूजा पहाटे करण्यात आली. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

वार्षिक उत्सव असल्याने श्री डोळसनाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या.तर अभिषेक, पूजेसाठी भाविकांकडून गर्दी झालेली होती. या अभिषेक व  पूजेचे काम  ग्राम पुरोहित  अतुल रेडे  यांनी व्यवस्थितपणे पार पाडले.

उत्सवसमितीकडून मंदिरावर आकर्षक रोषणाई फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती.खेळणी, खाद्य तसेच नवीन वस्तूंच्या दुकानामुळे शहर गजबजून गेले होते.

गणपती माळ येथील  घाटावर बैलगाडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाड्या स्पर्धा दोन दिवस होणार असल्याने काही स्पर्धा (दि 4) रोजी घेणार आहेत.

सायंकाळी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या पालखीचे ग्राम प्रदक्षिणेसाठी आयोजन करण्यात आले होते.  यावेळी बहुतांश नागरिकांनी, उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीच्या ग्राम प्रदक्षिणा मध्ये सहभाग दर्शवून दर्शनाचा लाभ घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.