Pimpri News : दुकानात चहा पित असलेल्या ग्राहकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – चहाच्या दुकानात चहा पित असलेल्या एका व्यक्तीवर चार जणांनी मिळून कोयते, सिमेंटच्या गट्टूने खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी लालटोपीनगर, पिंपरी येथील महाराष्ट्र टी हाऊस या दुकानात घडली.

नबीलाल बंदगी शेख (वय 34, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमित ससाने (वय अंदाजे 24), साजन ससाने (दोघे रा. मोरवाडी कोर्टाच्या मागे, पिंपरी) आणि त्यांचे दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास लालटोपी नगर येथील महाराष्ट्र टी हाऊस या चहाच्या दुकानात चहा पित होते. त्यावेळी चार आरोपी कोयते घेऊन आले. आरोपी सुमित याने फिर्यादी यांना ‘तू माझ्याकडे डोळे वटारून बघतो का. थांब तुला दाखवतोच’ असे म्हणत कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टूने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारले. यात फिर्यादी शेख यांच्या डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.