Chikhali News : कुदळवाडीत भंगारच्या दुकानात दरोडा; पाच तृतीयपंथीयांना अटक

एमपीसी न्यूज – कुदळवाडी येथील एका भंगार दुकान चालकाला व त्याच्या भावाला मारहाण करून तृतीयपंथीयांनी दुकानात दरोडा टाकला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी साडेदहा वाजता घडली. पोलिसांनी पाच तृतीयपंथीयांना अटक केली आहे.

ऋतू संजय जगताप (वय 22), अलिशा संभाजी पवार (वय 33), मन्नत गोरख खवळे (वय 22, तिघे रा. टाळगाव चिखली), किरण बाळू वाघ (वय 26, रा. मोहननगर, चिंचवड), अर्चना दत्ता शिंदे (वय 21, रा. विघ्नहर्ता चौक, चिखली) अशी अटक केलेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद रज्जाक अब्दुलरौफ चौधरी (वय 32, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुदळवाडी येथे मेन रोडवर राजा एंटरप्रायजेस नावाचे भंगारचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता तृतीयपंथीयांनी चौधरी यांच्या दुकानात येऊन पैसे मागितले. सुट्टे पैसे नसल्याने चौधरी यांनी ‘अभी कुछ भी धंदा नहीं हुआ थोडी देरबाद आओ’ असे सांगितले. त्यावरून आरोपींनी चिढून शिवीगाळ केली.

दुकानासमोर कपडे काढून नग्न होण्याचा आरोपींनी धाक दाखवला. मोठमोठ्याने टाळ्या वाजवून सर्वजण दुकानात घुसले. फिर्यादी चौधरी व त्यांच्या भावाला आरोपी तृतीयपंथीयांनी मारहाण केली. दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमधून चार हजार 200 रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम मस्के तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.