Express Way Accident News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सहा वाहनांचा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, सातजण जखमी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने सहा वाहनांचा अपघात झाला. यामध्ये चारजण जागीच ठार झाले. चौघांना किरकोळ दुखापत झाली असून तिघांना मुकामार लागला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. 15) सकाळी पावणे सात वाजता खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

गौरव खरात (वय 36), सौरभ तुळसे (वय 32), सिद्धार्थ राजगुरू (वय 31), चौथ्या व्यक्तीचे नाव समजून येत नाही (सर्व रा. सोलापूर) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (किलोमीटर 39.000) एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक मुंबई लेनवरील पहिल्या लेनवर बंद पडला होता. त्यामुळे काही अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली असल्याने वाहतूक संथ गतीने चालू होती. त्यावेळी ट्रक क्रमांक एम एच 46 / ए आर 3877 वरील चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील स्विफ्ट कार (एम एच 13 / बी एन 7122), टेम्पो (एम एच 10 / ए डब्ल्यू 7611) ला पाठीमागून जोरदार धडक दिली.

त्यामुळे तीन वाहने त्यापुढील कार (एम एच 21 / बी क्यू 5281) व कंटेनर (एम एच 46 / बी एम 5259) वर आदळून अपघात झाला आहे. अपघातामध्ये स्विफ्ट कार (एम एच 13 / बी एन 7122) मधील चैघांचा जागीच मृत्यू झाला. कार (एम एच 21 / बी क्यू 5281) मधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. तसेच टेम्पो (एम एच 10 / ए डब्ल्यू 7611) मधील चार प्रवाशांना मुकामार लागला आहे.

घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, देवदूत टीम, आयआरबी कडील यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातातील सर्व सहा वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. खोपोली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.