शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Pune News : लग्न झाल्यानंतर हुंडा मिळण्याच्या लालसेपोटी 3 वर्षीय चिमुकलीचे अपहरण, पोलिसांनी केली सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज : रस्त्यावर मिळेल ते काम करून फूटपाथवर राहणाऱ्या एका 3 वर्षीय चिमुकलीचे झोपेत असताना अपहरण करण्यात आले होते. 3 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीला शोधून काढले. याप्रकरणी एका महिलेला अटक देखील केली. तिच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. लग्नात मुलीला हुंडा मिळतो अन भिक मागण्यासाठी एकाने तीचे अपहरण केले होते. 

उषा नामदेव चव्हाण (वय ४६, रा. मुळ श्रीगोंदा) असे अटक केलेल्या अपहरणकर्त्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गौरी विनोद गायकवाड (वय ३) असे सुटका केलेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत गौरी हिची आई मयुरी यांनी तक्रार दिली आहे.

मयुरी यांना दोन अपत्ये आहेत. ढोले पाटील रस्त्यावर त्या रस्त्याच्या कडेला फुगे विकतात. फुटपाथवरच त्यांची झोपडी आहे. गेल्या आठवड्यात (दि.२३ मे) दिवसभर फुगे विक्री करत असताना दुपारी उन्हामुळे त्या रिक्षात बसून विश्रांती घेत होत्या. तर, त्यांची दोन्ही मुले ही खेळत होती. मयुरी यांना डोळा लागला आणि त्या रिक्षातच झोपी गेल्या.

दरम्यान, भर दुपारी दिडच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गौरीचे अपहरण केले. मयुरी या उठल्यानंतर त्यांना मुलगी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी शोधा शोध केली. पण, ती कुठेच सापडत नसल्याने त्यांनी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानूसार पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक महिला तिला ओढणीत गुंढाळून नेत असल्याचे कैद झाले. पोलीसांनी परिसरातील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही तपासून या महिलेची ओळख पटविली. ती एका विशीष्ट समाजाची महिला असल्याचे लक्षात आले.

खबऱ्यामार्फत तिची माहिती घेतली असता ती श्रीगोंदा येथील असल्याचे समजले. त्यानूसार श्रीगोंदा शहर गाठले. तिचा या शहरात ठावठिकाणा शोधुन तिला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर तिने मुलीचे अपहरण केल्याचे मान्य केले. तिच्या घरातून या चिमुकलीला सुखरूप ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, उषा हिने लग्नामध्ये नवऱ्या  मुलाकडून हुंडा मिळतो तसेच भीक मागण्यास वापर करण्यासाठी तिचे अपहरण केल्याची माहिती दिली. पोलीसांनी तिला अटक केली आहे.

 

spot_img
Latest news
Related news