Chikhali News : मोरेवस्ती येथील भाजी मंडईत खंडणीसाठी टोळक्याचा राडा 

भाजीच्या हातगाड्या उलटून देत कोयत्याचा धाक दाखवला 

एमपीसी न्यूज – इथे भाजी विकायची असेल तर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत एका टोळक्याने भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या उलटून दिल्या. लाकडी दांडके व कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याने भाजी मंडईत राडा घातला. ही घटना मंगळवारी (दि. 11) रात्री सात वाजताच्या सुमारास अष्टविनायक चौक भाजी मंडई, मोरेवस्ती येथे घडली.

सुनील रमेश इब्राहिमपूरकर, प्रशांत शिवाजी हळदमणी, आकाश बाबू नडवीन्मनी, जॉन, विकास (सर्व रा. सिंहगड कॉलनी, चिखली) आणि त्यांचे दोन तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जहिरुद्दीन जफिरुद्दीन शाह (वय 37, रा. अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इतर भाजीपाला विक्रेते अष्टविनायक चौक मोरेवस्ती येथील भाजी मंडईत भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी रात्री सात वाजताच्या सुमारास चिखली परिसरात गुंडागर्दी करणारे आरोपी भाजी मंडईत आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे भाजीपाल्याची हातगाडी लावण्यासाठी प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला.

आरोपींनी भाजी मंडईतील इतर पंधरा ते वीस हातगाडी वाल्यांकडे हप्ता मागितला. अन्य भाजी विक्रेत्यांनी देखील आरोपींना हप्ता देण्यास नकार दिला. ‘तुम्ही आम्हाला हप्ता देणार नाही. मग तुम्ही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय कसे करता तेच आम्ही बघतो’, अशी आरोपींनी धमकी दिली.

आरोपी भाजी मंडईतून निघून गेले आणि काही वेळाने पुन्हा लाकडी दांडके, कोयते घेऊन आले. भाजी मंडईमध्ये आरडाओरडा व शिवीगाळ करत आरोपींनी भाजी विक्रेत्यांना मारहाण करत त्यांच्या भाजीच्या हातगाड्या उलट्या पालट्या केल्या. भाजी मंडईतील नागरिकांनी भीतीपोटी पळापळ सुरू केली. आता ही तुमच्यासाठी वार्निंग आहे. हप्ता न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.