Nigdi News : माझ्या मुलाला न्याय मिळवून द्या; जलतरण तलावात बुडालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे पोलिसांना निवेदन

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या अभियांत्रिकीच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत तरुणाच्या वडिलांनी निगडी पोलिसांना निवेदन दिले आहे. माझ्या मुलाला आणि कुटुंबियांना न्याय द्या, अशी मागणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.

कृष्णा क्षीरसागर (वय 19, रा. बॉईज हॉस्टेल, निगडी. मूळ रा. नांदेड) असे जलतरण तलावात बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी माणिकराव क्षीरसागर यांनी निगडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

कृष्णा आकुर्डी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. 8 मे रोजी सकाळी तो त्याच्या मित्रांसोबत आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी गेला. जलतरण तलावात पोहत असताना बराच वेळ झाला तरी कृष्णा पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला आणि तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच कृष्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मात्र कृष्णाचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचे त्याच्या वडिलांचे मत आहे. ‘माझा मुलगा पिंपरी चिंचवडमध्ये शिकत होता. 8 मे रोजी सकाळी 8.20 ला त्याचा छत्रपती शिवाजी महाराज जलतरण येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याचा सखोल तपास करून माझ्या मुलाला व कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. जलतरण तलाव, होस्टेल, कॉलेज स्टाफ व मुलांकडे चौकशी करावी,’ असे शिवाजी क्षीरसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.