Chakan News : पावसाचे पाणी काढून देत जमीन मालकाच्या भिंत व पिकाचे 13 लाखांचे नुकसान

18 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मुसळधार पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी पाणी काढून देत 18 जणांनी मिळून एका जमीन मालकाच्या कंपाउंडची तोडफोड करून 10 लाख तर तीन लाखांचे पिकाचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या कालावधीत खेड तालुक्यातील कुरुळी गावात घडली.

शीतल भागूजी जाधव (वय 26, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिल्पा प्रेम सोनवणे, विशाल सोनवणे, नितीन कड, रामनाथ सोनवणे, कुंडलिक घाडगे, गोरक्ष घाडगे, गुलाब घाडगे, बाळू घाडगे, भानुदास घाडगे, विलास घाडगे, राजेश घाडगे, शांताराम घाडगे, वेताळ व इतर पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री कुरुळी परिसरात मुसळधार पाऊस पडला. यावेळी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी विलास घाडगे यांच्या घरातील जेसीबी तसेच स्वप्नील सोनवणे यांचा जेसीबी घेऊन आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. पाण्याचा निचरा करण्यासाठी दंगा करून फिर्यादी यांच्या जागेत अतिक्रमण केले.

फिर्यादी यांच्या वॉल कंपाउंडचे नुकसान करण्याच्या उद्देशाने सहा ठिकाणी वॉल कंपाउंड तोडून दहा लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच आरोपींनी सर्व पाणी फिर्यादी यांच्या शेतात सोडून शेतातील ज्वारी पिकाचे तीन लाख रुपयांचे नुकसान केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.