Pune Crime News : पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी अटकेत

एमपीसी न्यूज : राज्यभरात झालेल्या आरोग्य भरतीचा पेपर फुटला होता. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या पेपरफुटीचे धागेदोरे मुंबईत पोहोचले असून आरोग्य संचालनालयातील एका अधिकाऱ्याला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याचा सहभाग यात आढळून आला आहे. तो या समितीत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील आरोग्य विभागातील सह संचालक वरिष्ठ अधिकारी महेश बोटले असे ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सह संचालकाचा अतिरिक्त कार्यभार असून, ते देखील मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत. आरोग्य विभागाच्या लातूर विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांच्यासह पाच शासकीय कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यानंतर झालेल्या तपासात बुधवारी सायबर पोलिसांनी बोटले याला ताब्यात घेतले आहे. तो पेपर सेटिंग कमिटीत होता. त्याने हा पेपर पेन ड्राइव्हमधून पाठवला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार त्याला पकडण्यात आले आहे.

पेपर देण्याच्या मोबदल्यात एका उमेदवाराकडून सहा ते सात लाख रुपये घेण्याचे ठरले होते. त्यातील पन्नास हजार रुपये आरोपींना मिळणार होते. आणि बाकीची रक्कम त्यांना इतरांना द्यावी लागणार होती. उमेदवारांनी अद्याप पैसे दिले नव्हते. मात्र यादीत नाव आल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागणार होते. त्यासाठी आरोपींनी उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्र ठेवून घेतली असल्याचेही समोर आले आहे.

या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत विजय प्रल्हाद मुऱ्हाडे, अनिल दगडू गायकवाड, बबन बाजीराव मुंडे, सुरेश रमेश जगताप, संदीप शामराव भुतेकर प्रकाश दिगंबर मिसाळ, उद्धव प्रल्हाद नागरगोजे, प्रशांत व्यंकटराव बडगिरे, संदीप त्रिंबकराव जोगदंड, श्याम महादू म्हस्के आणि राजेंद्र पांडुरंग सानप या आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.