Pune News : पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्याच्या येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत. तर सुमारे दहा कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. स्लॅबचा ढिगारा आणि सळयांमध्ये अडकलेल्या कामगारांना पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शास्त्रीनगर चौकतील वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. काम सुरू असताना रात्री 11 वाजता अचानक स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी पोहोचल्या व जवानांनी कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. काही कामगार या सळयांमध्ये अडकल्याने सळया कापून त्यांना बाहेर काढल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात येत आहेत. तर जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बांधकाम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी बांधकाम प्रकल्पावर घेण्यात आली होती की नाही याचा पोलिस तपास करत आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.