Pune News : पुण्यात रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. भारती विद्यापीठ, विमानतळ आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत या घटना घडल्या. संबंधित पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज नवीन बोगदा जवळ 26 जानेवारी च्या रात्री अपघात झाला. भरधाव वेगातील कंटेनर चालकाने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या चार चाकीला आणि एक दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील आकाश सुरेश पांगारे यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.

विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फॉरेस्ट पार्क रस्त्यावर 22 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात सुनील थोपटे (वय 56) यांचा मृत्यू झालाय. टेम्पो चालक सचिन दत्तात्रय जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सचिन जाधव याने भरधाव वेगात टेम्पो चालवून सुनील थोपटे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने थोपटे यांचा मृत्यू झाला.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मंतरवाडी ते कात्रज रस्त्यावर 26 जानेवारी रोजी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एका 45 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला. मयत व्यक्ती ही रस्त्याने चालत जात असताना अनोळखी वाहनचालकाने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.